दि.१५ (प्रतिनिधी) शेतकरी, व्यापारी, उद्योजकांमुळे महाराष्ट्र प्रगतशील राज्य आहे. महाविकास आघाडीच्या नेत्याने खालच्या पातळीवर जाऊन टीका करत राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना भेसळखोर म्हटले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अशा नेत्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवावी. आम्ही कायम व्यापारी, उद्योजकांचा सन्मान केला. बीडमधील व्यापाऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांना विधिमंडळात पाठवा, असे आवाहन शिवसेना नेते, उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांनी केले.
महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ शहरातील वैष्णव पॅलेस येथे शुक्रवारी (दि.१५) ना.उदय सामंत यांनी व्यापारी संघटनांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर, दिनकर कदम, विलास बडगे, लाडकी बहीण योजना समितीचे बीड विधानसभा अध्यक्ष अमर नाईकवाडे, राणासिंग चव्हाण, राजेंद्र क्षीरसागर, भास्कर जाधव, नानासाहेब काकडे, बबनराव गोरे, युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक अविनाश जाधव, सुमित कोळपे, अजय सुरवसे, सूरज चव्हाण, बीड जिल्हा व्यापारी महासंघ, शहर व तालुका असोसिएशनचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
बीडमध्ये व्यवसायाला गती देणार
बीडच्या आमदाराने काहीच काम केले नाही म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर त्यांची कायम उदासीनता राहिली. त्यांना व्यवसाय, उद्योग, एमआयडीसीसाठी विशेष काही करता आले नाही. या भागातील रस्ते होणे गरजेचे आहेत. एमआयडीसीतून नाळवंडीकडे जाणारा मुख्य रस्ता नवीन सरकार येताच करून घेतला जाईल. एमआयडीसीमध्ये रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रस्ताव दिलेले आहेत. रिंग रोडचा प्रश्न सोडवायचा आहे. व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी मी विशेष लक्ष देईल. शहरातील व्यवसायाला चालना देण्यासाठी आपण घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावे, असे आवाहन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.
व्यापारी सुशिक्षित उमेदवाराच्या मागे
पुढे बोलताना ना.उदय सामंत म्हणाले, माझे व डॉ.योगेश यांचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांची निवडणुकीतील घड्याळ ही निशाणी जरी चार नंबरवर असली तरी डॉ.योगेश क्षीरसागर हा उमेदवार एक नंबर आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजकांमुळे महाराष्ट्र प्रगतशील राज्य आहे. महाविकास आघाडीच्या नेत्याने व्यापाऱ्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना भेसळखोर म्हणाला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अशा नेत्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवावी. मी देखील व्यावसायिक आहे, आमचा पारंपारिक व्यवसाय ठेकेदारी आहे. ठेकेदारी करणे चूक नाही, ठेकेदारांकडून वसुली करणे चुकीचे, असाच प्रकार बीडमध्ये घडला आहे, असे म्हणत आ.संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला. समोरचा उमेदवार नेमका कोणत्या पक्षात आहे? हे त्यालाच माहिती नसते. तो कधी म्हणतो शरद पवार, उध्दव ठाकरे तर कधी मनोज जरांगे पाटील यांचे नाव घेतो. आधी त्यांनी एकदा ठरवावे कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायची आहे. निवडून आल्यास दंड थोपटून, दादागिरी करून चालत नसते, असेही ते म्हणाले. क्षीरसागर कुटुंबाचे सर्व क्षेत्रात मोठे कार्य आहे. कुटुंबाचा नावलौकिक करण्याऐवजी इथल्या समोरच्या उमेदवाराने नाव घालण्याचा प्रयत्न केला. परंतु जयदत्त क्षीरसागर, डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉ.योगेश क्षीरसागर हे काम करत आहेत. ते विधिमंडळात माझ्यासोबत येणारच आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या सर्वांच्या वतीने मी बीडचे विकासाचे प्रश्न सोडवतो, असा शब्द देतो, मात्र तुम्ही बीडकर डॉ.योगेश यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. बीडमध्ये व्यापार पेठ, एमआयडीसी पाहिली, यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी स्वतःसाठी काही मागितले नाही. तुमच्या प्रश्नांची मांडणी करत होते. अशी प्रश्नांची जाण असलेले डॉ.योगेश क्षीरसागर यांना विधिमंडळात पाठवा. यापूर्वी मी सुद्धा घड्याळाचा उमेदवार होतो. जेवताना, झोपताना, उठताना आपण घड्याळ पाहतो. त्यामुळे घड्याळाला अनन्यसाधारण महत्व आहे, अगदी तसेच महत्त्व बीडचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांना आहे. बीड विधानसभा मतदारसंघात लाडक्या बहीण योजनेचा लाभ ९८ हजार महिलांना मिळाला. त्यामुळे आपल्या उमेदवाराला ९८ हजारच्या पुढे मते मोजायची आहेत. त्यामुळे डॉ.योगेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास ना.उदय सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीड शहर आणि मतदारसंघातील व्यापारी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासारख्या सुशिक्षित उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील. नवीन सरकार महायुतीचे येईल, तेव्हा बीडमध्ये व्यापारी भवन उभारावे, एमआयडीसीत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. व्यवसाय कर रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशा मागण्या जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर जाधव यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केल्या.