बीड (प्रतिनिधी)
दि.१२ : मी राजकारणामध्ये आमदार, खासदार या पदासाठी नसून आमदार, खासदार बनवण्यासाठी आहे. डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांची आमदारकीची इच्छा पूर्ण नाही झाली, मात्र डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या रूपाने ही इच्छा पूर्ण होईल म्हणून डॉ.योगेश क्षीरसागर यांना संधी द्या असे प्रतिपादन भाजपच्या स्टार प्रचारक, राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंडे यांनी केले.
शिरूर कासार तालुक्यातील रायमोह येथे महायुतीचे बीडचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि.१२) जाहीर सभा पार पडली. यावेळी मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर डॉ.योगेश क्षीरसागर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड.सर्जेराव तांदळे, वैजनाथ मिसाळ, वसंतराव सानप, सुधाकर मिसाळ, सलीम जहांगीर, शांतीनाथ डोरले, जालींदर सानप, चंद्रकांत फड, देविदास नागरगोजे, बप्पासाहेब घुगे, डॉ.लक्ष्मण जाधव, अक्षय रणखांब, अनिल चांदणे, विक्रांत हजारी, अभय वनवे, सुनिल मिसाळ, विजय सरवदे, गणेश कोळेकर, अजय सवई, चंद्रकांत सानप, अशोक इंगळे, संतोष कंठाळे, हाशम शेख, दादासाहेब सानप, प्रिया ढाकणे, सुलेमान पठाण, सुभाष क्षीरसागर, सखाराम जाधव, विवेक साखरे, संग्राम बांगर, राजाभाऊ जाधव, बाबासाहेब सानप, अरूण भालेराव, गणेश घोलप यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सरपंचांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, आता आपण चांगल्या माणसाला संधी द्यायची. बीडच्या जागेबाबत तिढा होता. माझं अजित दादांशी बोलणं झाल्यानंतर रात्री एक वाजून 40 मिनिटांनी फोन केला. पक्ष कोण लढणार हाच पहिला प्रॉब्लेम होता शिवसेना लढणार आहे की राष्ट्रवादी आणि त्याच्यामुळे या सगळ्या विषयातून शेवटी हे तिकीट मार्गी लागलं आणि अजित दादांनी निर्णय घेतला आणि तो निर्णय योग्य आहे असं माझं मत मी त्यांना मांडलं आणि त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मी आज इथे उभी आहे. अशी गणित बसली आहेत की या जिल्ह्याचा निवडणुकीचा इतिहास आपण लिहिणार आहोत. ज्या लोकांनी माझ्यासाठी खस्ता खाल्ल्यात आज त्यांच्या हातामध्ये जादूची कांडी आहे. भारतभूषण क्षीरसागर यांची आमदारकीची इच्छा पूर्ण नाही झाली तरी योगेश तुमची ही इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद मी देते. योगेश यांनी मला एक फोन केला आणि म्हणाले ताई मी डॉक्टर आहे सर्जन आहे माझ्याकडे पैशाची काही कमी नाही मला पैशासाठी राजकारण करायचं नाही, मला राजकारण पदासाठी मसलपावर साठी करायचं नाही, माझ्यामध्ये कुठलाही दुर्गुण नाही, मला फक्त माझ्या वडिलांना जे व्हायचं होतं त्यासाठी एकदा आमदार होऊन माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करायची आहे. योगेश यांना निवडून आणायची जबाबदारी माझ्यावर आहे. कधी चुकीची फेक नरेटिव्ह, चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेली लाट चांगल्या माणसाला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर काढू शकते आणि जिल्ह्याचा विकास कोसो दूर फेकला जातो. मी तुम्हाला गॅरंटी देते योगेश क्षीरसागर यांच्यावतीने की ते कुठल्याही गावाच्या विकासामध्ये भेदभाव करणार नाहीत. त्यांच्याकडे टक्केवारी ला आणि तोडपाणीला स्थान नाही. मी गॅरंटी देते की ते नगरपालिका आणि पंचायत समितीला कार्यकर्त्यांना संधी देतील. योगेश यांनी ठरवले आहे की मी माझ्या कार्यकर्त्यांना परिवार म्हणून त्यांना संधी देईल आणि त्यामध्ये ते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये भेदभाव करणार नाहीत. मनातून किंतु परंतु काढून टाका मी तुमच्या बाजूने त्यांच्याबरोबर उभी आहे, या भागाचा विकास मी करून दाखवणार. बीड जिल्ह्यामध्ये असा निकाल लागला पाहिजे की पूर्ण देशाने म्हणले पाहिजे की हे बीड जिल्ह्याचे लोक विकासाच्या मागे उभे राहतात. ऊसतोड कामगारांना मी हात जोडते तुम्ही वीस तारखेला मतदान करूनच कारखान्यावर जा अशी माझी विनंती आहे. वीस तारखेपर्यंत कुणीही जायचं नाही गाव सोडायचं नाही २० तारखेला मतदान करूनच जायचं. ऊस तोडून या तोपर्यंत मी आपले सरकार आणते. आपण सर्वांनी २० तारखेला घड्याळासमोरचे बटन दाबून महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांना विजयी करा आणि माझ्या विनंतीला मान द्या, असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले. यावेळी अनेक पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त करून डॉ.योगेश क्षीरसागर यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
पंकजाताई मुंडे यांनी जादूची कांडी फिरवताच
मला उमेदवारी मिळाली -डॉ.योगेश क्षीरसागर
मी डॉक्टर असलो तरी पंकजाताई राजकारणातील डॉक्टर आहेत. आज जागतिक निमोनिया दिवस आहे. मतदारसंघात आमदारांनी पसरवून ठेवलेला निमोनिया दूर करण्याची शस्त्रक्रिया मी नक्की करेन. त्यासाठी मला एकदा संधी द्या. पंकजाताईंचे लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले. त्याची त्यांनी वेळोवेळी दखल घेतली. माझ्या उमेदवारीमागे एक अदृश्य शक्ती होती, असा मी मागे उल्लेख केला होता. आज जाहीरपणे सांगतो की, ती अदृश्य शक्ती पंकजाताई मुंडे ह्या होत्या. त्यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम असेल. पंकजाताई मुंडे यांनी जादूची कांडी फिरवताच मला उमेदवारी जाहीर झाली. भाजप, राष्ट्रवादीसह महायुतीच्या सर्व पदाधिकार्यांना मान देईन. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आपण सोबत राहू. मला विजयी करून मतदारसंघाच्या विकासासाठी एक संधी द्यावी, असे आवाहन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.