शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे .यापुढे आपण मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काम करणार आहोत असे जाहीर केले आहे .अनिल जगताप यांनी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांना डावलून बीड विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली त्यामुळे अनिल जगताप यांची संधी गेली.
अनिल जगताप यांनी साऱ्या घडामोडी लक्षात घेऊन अपक्ष उमेदवार अर्जही दाखल केला होता आणि सर्व मराठा उमेदवारांच्या सोबत मनोज जरांगे पाटील हे ज्या उमेदवाराला अर्ज कायम ठेवण्यास सांगतील त्याला पाठिंबा देऊ असेही जाहीर केले होते. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी काहीच निर्णय न दिल्याने अनिल दादा जगताप यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला त्यामुळे ते अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले .
अनिल जगताप यांनी बीड विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी जबरदस्त तयारी केली आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत मतदारात जनजागृती निर्माण केली आहे. रोजगार मेळावा ,होम मिनिस्टर, आरोग्य शिबीरे आणि घरोघर संपर्क करून त्यांनी आपली उमेदवारी कायम असेल हे आधीच स्पष्ट केले होते .या पार्श्वभूमीवर वेगळ्या राजकीय घडामोडींमुळे त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली .त्यांच्याबद्दल बीड विधानसभा मतदारसंघात सहानुभूती आहे .लोकांच्या कामाला येणारा उमेदवार आणि सहज उपलब्ध होणारा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.” माझी काहीही चूक नसताना बीड विधानसभा मतदारसंघात मला एकट्याला टार्गेट केले जात आहे आता यापुढे मी कोणत्याही पक्षात जाणार नाही ” अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली असून आता बीड विधानसभा मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. त्यातच मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा त्यांना पाठिंबा असल्याची चर्चा असल्यामुळे अनिल जगताप यांचे पारडे जड झाले आहे .त्यांच्या या निर्णयाचे त्यांच्यासोबतच्या समर्थकांनी आणि बहुसंख्यांक शिवसैनिकांनी स्वागत केले आहे.