अजितदादांचे विश्वासू साथीदार यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरोधात वेगळी भूमिका मांडली आहे आणि तीही केवळ बालमित्राच्या प्रेमापोटी यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माजलगाव मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार प्रकाश सोळंके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशोक डक यांनी रमेश आडसकर यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवार यांचे निकटवर्ती आणि धनंजय मुंडे यांचे विश्वासू म्हणून अशोक डक यांची ओळख आहे.
रमेश आडसकर हे माझे बालपणीचे मित्र आहे. मागे त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली होती. त्यावेळीही मी पक्षश्रेष्ठींना सांगून रमेश आडसकर यांचाच प्रचार केला होता अन यावेळीही मी आडसकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मी कोणत्याही प्रकारची बंडखोरी केली नाही. मागील निवडणुकीत आडसकर पराभूत झाले होते. पण तरीही त्यांनी माजलगाव मतदारसंघामध्ये प्रचंड काम केलं होतं. त्यामुळे ते मला या निवडणुकीत जवळचे वाटले .त्यामुळे परिणामाची चिंता न करता निर्णय घेतला आहे, असंही अशोक डक म्हणाले.
‘बालपणीच्या मित्राला मदत करायची म्हणून अशोक डक यांनी हा निर्णय घेतला आहे. पक्षाने कारवाई केली तरी हरकत नाही. पण यावेळेस अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांना निवडून आणणारच, असा निर्धार अशोक डक यांनी व्यक्त केला. अशोक डक हे मुंबई एपीएमसी मार्केट कमिटीचे अध्यक्ष आहेत.