
बीड – उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर विधानसभा निवडणुक चांगलीच रंगात येत आहे. विविध पक्षांचे व अपक्ष उमेदवार आपापल्या परीने प्रचारावर भर देत आहेत. अशातच आष्टी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार चांगदेव गीते यांनी गळ्यात ‘एमआयडीसी’ नाव लिहून तसा फलक घालत प्रचार सुरु केला आहे.
चांगदेव गीते हे पदवीधर युवक असून बेरोजगारांच्या प्रश्नांवर ते सातत्याने आंदोलने करत आलेले
आहेत. यापूर्वी त्यांनी नोकरी मिळत नसल्याने प्रतिकात्मक स्वरूपात डिग्री विकायला काढत युवकांची व्यथा मांडली होती. आष्टी मतदारसंघातील तीनही तालुके दुष्काळी असून या भागात एमआयडीसी उभारत युवकांना रोजगार दिला पाहिजे, ग्रामीण रस्ते, चांगल्या शैक्षणिक सुविधा, कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह, नियमित पाणीपुरवठा असे मुद्दे ते मांडत आहेत. त्यांच्या या गळ्यात फलक घालून सुरु असलेल्या प्रचाराची तरूणाईत चांगलीच चर्चा आहे.