
मुंबई येथे रमेश आडसकर यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश केला आहे.माजलगाव विधानसभा मतदारसंघातून रमेश आडसकर हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत,त्यांना विद्यमान आमदार तथा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्याशी लढावे लागणार आहे.
रमेश आडसकर यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे त्यात ते पराभूत झाले होते. पण नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणात त्यांना मोठे यश मिळालेले आहे , ते बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि विविध खात्यांचे सभापतीही होते.स्वर्गीय आमदार बाबूराव आडसकर यांचे ते सुपुत्र असून एक साखर कारखाना आणि शिक्षण संस्थांचे जाळे त्यांनी केज आणि अंबाजोगाई परिसरामध्ये उभे केले आहे. अंबाजोगाई आणि आडस मध्ये त्यांचे वास्तव्य असते, दांडगा जनसंपर्क हे त्यांची वैशिष्ट्य असून ते माजलगाव मतदार संघात प्रकाश सोळंके यांना तगडे आव्हान निर्माण करू शकतात .ही निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे.