बीड : जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपी सुनील झंवर, तसेच कुणाल शाह यांनी पोलीस महासंचालकांकडे दिलेल्या तक्रार अर्जावरून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला आहे. त्यानंतर सीबीआयने याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी सीबीआयने नवटाकेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नवटाके यांनी यांनी १,२०० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करणार्या पथकाचं नेतृत्त्व केलं होतं. यात त्यांनी उचित कारवाई केली नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनी यामध्ये आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप होत आहे.
नवटाके यांनी प्रचलित कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष करून घाईगडबडीने, तसेच कोणता तरी हेतू ठेवून गुन्हे दाखल केले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलीस उपायुक्त नवटाके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा सीबीआयकडे तपासासाठी सोपवण्यात आला असून आता सीबीआयने नवटाके यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.