
अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ठरले. जम्मूतील सुरेंद्र चौधरी यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय चार आमदारांनी बुधवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. जावेद डार, सकीना इटू, जावेद राणा आणि सतीश शर्मा यांना मंत्री करण्यात आले आहे. आज मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीला 49 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला केवळ 29 जागा मिळाल्या आहेत. भाजपला मिळालेल्या सर्व जागा जम्मू विभागातील आहेत. तर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला सर्वाधिक जागा श्रीनगरमध्ये मिळाल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये जम्मूला काही मिळणार का, याबाबत उत्सुकता होती.
जम्मूतील नौशेरा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना यांचा पराभव करणारे सुरेंद्र चौधरी यांनाच उपमुख्यमंत्री करत अब्दुल्लांनी सर्वांचीच तोंडे बंद केली आहेत. अब्दुल्ला यांचा या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे. कारण जम्मूत भाजपची ताकद मोठी आहे. त्याला शह देण्यासाठी चौधरींना सरकारमध्ये महत्वाचे स्थान दिल्याचे मानले जात आहे.
काँग्रेस कॅबिनेटमध्ये नाही
जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकीत अपेक्षित यश न मिळालेल्या काँग्रेसने कॅबिनेटमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या सहा आमदारांचा सरकारला बाहेरून पाठिंबा असेल. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने आघाडी करत निवडणूक लढवली होती. पण काँग्रेसला मागील निवडणुकीत मिळालेल्या जागाही टिकवता आल्या नाहीत.
आजच्या शपथविधी सोहळ्यात इंडिया आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सरचिटणीस प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आपचे खासदार संजय सिंह, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा, निवडणुकीत सुपडा साफ झालेल्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्यासह आघाडीतील इतर पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते.