महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारने आज पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांची माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. “शरद पवारांना यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगावा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुतीचा जागावाटापाचे सूत्र काय असणार? त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘लवकरच सांगू’.आम्ही निर्णय घेऊन “वेगवेगळ्या घटकांना दिलासा दिला आहे. कोतवाल, अंगणवाडी सेविका, आशाताई वर्कर प्रत्येक घटकाला आपण दिलासा दिला. होमगार्डचं मानधन दुप्पट केलं. त्यांच्याही जीवनात परिवर्तन केलं. आगरी, कोळी, गवळी समाज, शिंपी, सोनार, लोहार, आर्यवैश्य, तेली समाज असेल प्रत्येकाचे आपण महामंडळ तयार केलं आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख तरुणांना उद्योगपती केलं आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.“वृत्तपत्र विक्रेत्यांनाही आपण पहिल्यांदाच दिलासा दिला आहे. आपण पायाभूत सुविधांचं काम केलं आहे. समृद्धी महामार्ग, ग्रामीण महामार्ग, नवीन महामार्ग आदी कामे केली आहे. पायाभूत सुविधेच्या क्षेत्रात केलेलं काम अभूतपूर्व आहे. वाढवण बंदर हे महाराष्ट्राला 25 ते 30 वर्ष राज्याची आणि देशाची अर्थव्यवस्था हे बंदर चालवेल. जेएनपीटीपेक्षा तीन पट मोठं बंदर आहे. जगातील 10 बंदरांपैकी एक आहे. यातील सर्व अडचणी आपल्या सरकारने दूर केल्या आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विरोधक गोंधळलेले
“विरोधी पक्ष लाडकी बहिणीवर टीका करतो. मुलींना मोफत शिक्षण देणार कुठलं सांगत आहे. सरकारकडे पैसे नाही. पण त्यांचे नेते म्हणतात, आमचं सरकार आलं की आम्ही 2 हजार रुपये देऊ. मग विरोधकांनी ठरवलं पाहिजे सरकारकडे आहे की नाही. आम्ही काही योजना सांगितल्या आहेत. आणखी योजना जाहीरनाम्यात देणार आहोत. विरोधक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. सरकारकडे पैसे नाही म्हणतात आणि नवनवीन योजना विरोधक सुरू करत आहेत” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. आणखी योजना जाहीरनाम्यात देणार आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. म्हणजे आणखी काही समाजकल्याणकारी योजनांची घोषणा महायुतीकडून होऊ शकते.