केंद्रीय निवडणूक आयोग राज्यात आचारसंहिता लावण्याच्या तयारीत असताना राज्य सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती केली आहे.आज मंगळवारी दुपारी १२ वाजता ७ सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधीमंडळामध्ये उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला, महायुतीकडून 7 जणांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वर्णी लागली आहे. यात पोहरादेवी संस्थानचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड आणि चित्रा वाघ यांचा समावेश आहे.

आज शपथ घेणाऱ्या सात जनामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ , विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबुसिंग महाराज राठोड (भाजप)पंकज छगन भुजबळ, इद्रिस नाईकवाडी (राष्ट्रवादी काँग्रेस) हेमंत पाटील, मनिषा कायंदे (शिवसेना)यांचा समावेश आहे.
महंत बाबुसिंग महाराज यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, महाराष्ट्र सरकारने राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून माझे नाव जाहीर केले आहे.माझ्या नियुक्तीमुळे डॉ रामराव महाराजांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण झालं. आमच्या सर्व बंजारा समाजाला न्याय मिळावा म्हणून मला राज्यपाल आणि महायुती सरकारने विधान परिषदेचे सदस्य केले आहे. या आमदारकीच्या माध्यमातून मी बंजारा समाजासाठी तन-मन-धनाने कार्य करीन.
कोण आहेत बाबुसिंग महाराज?
महंत बाबुसिंग महाराज राठोड हे पोहरादेवी मठाचे पीठाधिश आहेत. ६३ वर्षीय बाबुसिंग महाराज यांनी बी.ए. पर्यंत शिक्षण घेतलं आहे. महंत डॉ रामराव महाराज यांच्या समाधी नंतर त्यांची पोहरादेवी शक्ती पिठाचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर रोजी नंगारा वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पणा वेळी महंत पिठाधिश बाबुसिंग महाराजांची भेट घेतली होती.