भाषा ही फक्त बोलण्याचे माध्यम नसून आपली संस्कृती, परंपरा, इतिहास आणि साहित्याशी भाषेची नाळ जोडलेली असते. आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेमुळे अधिक समृद्ध होते अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या मराठी भाषेचा गौरव केला.
केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. यानिमित्त मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबईत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह मान्यवर साहित्यिक आणि कलावंत उपस्थित होते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्याच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. तर मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी यावेळी पंतप्रधानांना मराठी ग्रंथ भेट स्वरूपात दिले.
प्रधानमंत्री श्री मोदी म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्ण क्षण आहे. मराठीमधील ज्ञानाने अनेकांना मार्गदर्शन केले आहे हे ज्ञान आजही तेवढेच उपयुक्त आहे असे सांगून महाराष्ट्र आणि मराठी धर्म वाढवणाऱ्या संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखामेळा आदींच्या परंपरेला त्यांनी दंडवत केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मान मिळाला हा महाराजांना केलेला मानाचा मुजरा असल्याचे ते म्हणाले. अनेक मराठी क्रांतिकारी लोकांनी जनजागृतीचे काम केले. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळकृष्ण गोखले आदींनी स्वराज्य मिळविण्यासाठी मनामनात चेतना निर्माण केली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मराठी भाषेचे मोठे योगदान असल्याचे सांगून मराठी भाषेने न्याय आणि समानता प्रस्थापित करण्यात मोलाचे योगदान दिल्याचे ते म्हणाले.
श्री मोदी म्हणाले, महाराष्ट्रात मराठी भाषेच्या माध्यमातून स्वराज्य, स्वसंस्कृती, स्वचेतनेचा विस्तार झाला आहे. महिला सशक्तीकरण अभियान, महाराष्ट्राचे औद्योगीकरण, कृषी क्षेत्राचा विकास या सर्वांच्या उत्कर्षाचे मूळ ही मराठी भाषा आहे. पोवाडा सारख्या लोकगीतांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज तसेच अनेक थोर पुरुषांची कीर्ती आणि गाथा जगासमोर मांडण्याचे काम आजही सुरू आहे. गणेशोत्सवातून जी भक्ती आपल्याला या भाषेच्या माध्यमातून पाहावयास मिळते ती संपूर्ण देशाला जोडण्याचे काम करते.
मराठी भाषेला हा गौरव मिळवून देण्यासाठी अनेक मोठे साहित्यिक, लेखक, कवी आणि असंख्य मराठी भाषिकांनी मोलाचे योगदान दिले आहे. मराठी साहित्याची परंपरा ही केवळ प्राचीन नाही तर ती बहूआयामी असल्याचे पंतप्रधान श्री मोदी यांनी नमूद केले. मराठी भाषेच्या उत्कर्षात सहभागी असलेल्या सर्व दिग्गज मराठी साहित्यिकांना त्यांनी वंदन केले. मराठी भाषेच्या विकासात मराठी चित्रपटांचे योगदानही मोठे आहे. मराठी रंगभूमीने समाजातील वंचित घटकांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
महाराष्ट्राने मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिले असून वैद्यकीय तसेच अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम देखील मराठी भाषेतून शिकविले जाणार आहेत, याचे पंतप्रधान श्री. मोदी यांनी कौतुक केले.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे शिक्षण, संशोधन तसेच रोजगाराच्या क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचावी अशी अपेक्षा व्यक्त करून मराठीला पुढे नेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी 1 मे 1960 नंतर 3 ऑक्टोबर 2024 हा राज्याच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक नामदेव कांबळे यांनी मराठी भाषकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करून शिक्षण क्षेत्राचे राष्ट्रीयकरण व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. ज्येष्ठ कलावंत सचिन पिळगावकर यांनी मराठीचा सन्मान हा आईचा सन्मान झाल्यासारखे वाटते अशी भावना व्यक्त करून प्रत्येकाने आपल्या मातृभाषेवर प्रेम करावे, असे सांगितले. तर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे मराठी संस्कृती, परंपरा यांना अधिकृत मान्यता मिळाल्याचे सांगून भाषेचा प्रसार आणि विकास करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याची भावना व्यक्त केली.
प्रास्ताविकात मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ३ ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, ही सर्वांसाठी आनंदाची बाब असल्याचे सांगून प्रधानमंत्री श्री मोदी यांचे आभार मानले. या गौरवाचा आनंद व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केल्याचे सांगून राज्य शासन राबवीत असलेल्या विविध योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. ३ ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषेचा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.