
बीड (प्रतिनिधी) वयाच्या साठी नंतर भविष्याची खरी काळजी सुरू होते, कुटुंबातील संख्या कमी होत असल्याने ज्येष्ठ व्यक्तींना आपल्याला कोण सांभाळेन? याची चिंता पडलेली असते, ही चिंता निराकरण करणारी ही कामधेनु केअर सेंटरची सेवा आज सुरू झाली ही आजच्या काळात महत्त्वाची आणि गरजेची सेवा असल्याचे मत ह. भ. प. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
पूर्वी प्रत्येक घरी गाय असायची, आज गोशाळेतून सांभाळ होत आहे हा विकल्प आहे. वृद्धांची सेवा घरातच असायला पाहिजेत पण आजच्या काळात ते शक्य होत नाही. सेवेमुळे आयुष्य, विद्या, यश, धन लाभत असते ही महत्त्वाची आणि गरजेची सेवा कामधेनु परिवाराकडून होत आहे.’ केअर ‘घेण्याची इच्छा मनात असते पण कुटुंबात तशी परिस्थिती नसते, त्याला हा पर्याय म्हणून कामधेनु केअर सेंटरच्या सेवेची सुरुवात झाली आहे. आयुर्वेद, वैद्यकीय शिक्षण आणि सेवा प्रकल्पात प्रत्यक्ष सोबत काम केलेले डॉ आनंत मुळे आणि श्रीगुरु संजय महाराज पाचपोर यांच्यासह विनायक महाराज पाटागंणकर, डॉ .अमोल गिते, वैद्य गणेश चरखा , वैद्य शिवप्रसाद चरखा ,डॉ अनुराग पांगरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

पेशंटला दिलासा मिळून लवकर बरा होण्यासाठीचा हा नावीन्यपूर्ण प्रयोग प्रथमच बीड शहरात सुरू झाला, ही महत्त्वाची सुश्रुषा वैद्यकीय क्षेत्रासाठी आहे, असे मत डॉ.अनंत मुळे यांनी व्यक्त केले तर पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात ज्येष्ठांचा सांभाळ त्यांची सुरक्षा करणारा अभ्यासक्रम आणि सेवा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरतात, वैद्यकीय उपचार आपापल्या डॉक्टर कडे घेता येतील पण हॉस्पिटल नंतरची सुश्रुषासाठीची सोय बीड शहरात पण गरजेची होती, ती कामधेनुच्या या केअर सेंटर मुळे भागणार आहे आणि जेष्ठांना आधार, दिलासा मिळणार आहे असे मत डॉ.अनुराग पांगरीकर यांनी यावेळी मनोगत आतून व्यक्त केले.

डॉ अरविंद श्रीनिवास कुलकर्णी, सौ मंजुषा, सौ. गार्गी सुमित कुलकर्णी यांनी कामधेनु परिवाराच्या वतीने सर्वांचे येथोचित स्वागत, सत्कार ,पूजन केले.