
अंबडचा दत्त जयंती संगीतोत्सव सुरू होऊन 100 वर्षे झालीत. गायनाचार्य स्व.गोविंदराव जळगांवकर पुढच्या वर्षीच्या संगीतोत्सवाची तयारी त्यांची विद्यमान वर्षीच्या संगीतोत्सवातील भैरवी सादर करून व्यासपीठाच्या खाली आले की सुरू करायचे.
” पुढच्या वर्षी यायचं हं ! “
असा आर्जवी आग्रह ते करायचे.त्यांच्या या स्वभावाने त्यांनी कलावंत आणि श्रोते यांच्याशी अतूट नातं निर्माण केलं.माझ्या अयोजनाच्या अनुभवातून एक सांगतो,कार्यक्रम कितीही दर्जेदार आयोजित करा पण श्रोते जमवणं सोपं नसतं. भाऊंनी हक्काचे श्रोते सुध्दा कायमस्वरूपी जमवले होते.रसिक कुठून कुठून अंबडला यायचे,इंदोर,हैदराबाद पासून ते जळगांव, शेंदूरणी, पाचोरा अन जालना औरंगाबाद पर्यंतची मंडळी तीन तीन चार चार दिवस मुक्काम करून गाणं ऐकायचे.भाऊ कलावंताची जशी वाट पहायचे तशीच या श्रोत्यांची देखील.दत्त जयंतीच्या काळात ते फक्त आणि फक्त संगीतोत्सवाचे असायचे.अत्यंत धकाधकीच्या जीवनात त्यांचं आरोग्य राखलं ते या संगीतोत्सवाने. त्यांचं गाणं अत्युच्च दर्जाचं होतच पण ते ऐकवण्यापेक्षा त्यांना नवोदित आणि पाहुण्या कलावंताना ऐकण्याची अन ऐकवण्याची ओढ असायची.भाऊंनी समोर बसून आपलं ऐकावं असं प्रत्येक कलावंताला वाटायचं अन भाऊ अगदी न कंटाळता त्याला समोर बसून दाद द्यायचे.भाऊ गेल्या नंतर त्यांच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणं अशक्य होतच,आहेही पण त्यांनी निर्माण केलेली संपन्न परंपरा पुढं नेण्याची जबाबदारी नव्या पिढीला पेलावीच लागणार आहे .
अंबडच्या दत्त जयंती संगीतोत्सवाचा इतिहास आणि गायनाचार्य गोविंदराव जळगांवकर यांचे जीवनकार्य हे एकरूप आहेत.भाऊंनी आपलं संपूर्ण जीवन हिंदुस्थानी संगीताच्या प्रसारासाठी व्यतीत केलं.रसिक श्रोता हा अभिजात संगीताकडे आकृष्ट व्हावा आणि प्रतिथयश कलावंतांबरोबरच नवोदित कलावंतांनाही व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांनी पदरमोड करून दत्त जयंती संगीतोत्सव जपला,वाढवला आणि सर्वदूर पोहचवला.म्हणूनच त्यांचं जीवनचरित्रही समजून घ्यायला हवं,ज्यामुळे त्यांचं ऐतिहासिक कार्य आणि महानत्त्व अधोरेखित होईल.
गायनाचार्य स्व.गोविंदराव जळगांवकर.
साधारण 1912-13 च्या दरम्यान श्री त्र्यंबकराव नारायणराव कुलकर्णी (जळगांवकर ) यांना त्यांचे गुरू पैठण येथील पन्नाभट्टी यांनी श्री दत्त जयंती आणि यानिमित्ताने संगीत सेवा सुरू करण्याचे सांगितले आणि अंबड तालुक्यातील त्यांचे राहते गांव असणाऱ्या भणंग जळगांव येथे श्री दत्त जयंतीचा उत्सव त्यांनी सुरू केला,यानिमित्ताने कथा-किर्तनाबरोबर ,भजन-गायन देखील आयोजित केले जायचे. दत्तभक्त असणाऱ्या त्र्यंबकराव यांनी हा उपक्रम नियमितपणे सुरू ठेवला ,त्यांचे सुपुत्र गायनाचार्य गोविंदराव जळगांवकर यांचा जन्म 11 जुलै 1933 रोजी भणंग जळगाव येथेच झाला आणि बालपण देखील तेथेच गेले,लहाणपणीपासूनच त्यांच्यावर वडिलांनी वारकरी संप्रदायाचे संस्कार केले ,दत्त जयंतीनिमित्तचे कार्यक्रम नियमित सुरूच होते,आठ आठ दिवस भजन-कीर्तन सुरू असायचे , कालांतराने गोविंदराव आणि कुटुंबियांनी अंबड येथे स्थलांतर केले,ऐकून आश्चर्य वाटेल पण प्रारंभी भाऊंनी म्हणजेच गोविंदरावानी एक ट्रक घेऊन ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला ,त्या ट्रकवर त्यांनी स्वतः ड्रायव्हर म्हणून काम केले पण या व्यवसायात ते फार रमले नाहीत.त्यांच्यात उपजत असणाऱ्या कलेने त्यांना गायनाकडे आकृष्ट केले. त्यांचे मेहुणे तथा प्रसिध्द वकील देविदासराव सबनीस यांनी अंबड येथेच त्यांना गायनाचे धडे घेता यावेत अशी व्यवस्था केली . हैदराबादचे प्रसिध्द गायक पं.वासुदेवराव नामपल्लीकर यांना निमंत्रित करून त्यांना गोविंदरावाना गाणे शिकवण्याची विनंती केली आणि गुरुच शिष्याच्या घरी येऊन विद्यादान करू लागले.त्यांच्याकडून आग्रा घराण्याचे गाणे गोविंदरावानी आत्मसात केले त्याला वारकरी संप्रदायाच्या परंपरेची जोड मिळाली . या दरम्यानच दत्त जयंतीचे स्वरूप केवळ धार्मिक आणि भजन-कीर्तन असे मार्यदित न ठेवता दुरदुरहून गायक कलावंत निमंत्रित केले जाऊ लागले पाहता पाहता दत्त जयंती संगीतोत्सवाला मोठे स्वरूप प्राप्त झाले. गायनाचार्य गोविंदराव जळगांवकर यांना देखील ठिकठिकाणाहुन गाण्यासाठी बोलावले जाऊ लागले,ते विनामूल्य सेवाभावी वृत्तीने गायनसेवा देत असत यामुळे त्यांच्याकडून देखील दत्त जयंती संगीतोत्सवात गायन वादन सादर करण्यासाठी बाहेरून येणाऱ्या कलावंतांनी कधी मानधनाची अपेक्षा केली नाही.घराच्या गच्चीवरून बाहेरच्या प्रांगणात आणि प्रांगणातून समाज मंदिरात अन आज गोविंदराव जळगांवकर नाट्यगृह या त्यांच्याच नावाने उभारण्यात आलेल्या सभागृहापर्यंत दत्त जयंती संगीतोत्सवाचा प्रवास झाला आहे ज्याला आज 100वर्षे पूर्ण झाले आहेत.21 मार्च 1998 रोजी पैठणला नाथषष्ठीसाठी गेले असता काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी अष्टमीला गायनाचार्य गोविंदराव जळगांवकर यांचे हृदययविकाराच्या धक्क्याने निधन झाले,त्यांच्या निधनानंतर देखील 26 वर्षे दत्त जयंती संगीतोत्सव नियमितपणे सुरू आहे याचे सारे श्रेय गोविंदराव जळगांवकर यांच्या संगीतावरील निष्ठेत आहे.ही परंपरा जपणे आणि पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे.
—- महेश वाघमारे.
9423168636
7020439204