गेवराई (प्रतिनिधी) दि. १२ विधानसभेची निवडणुक संपली, राजकारण संपले आता विकास कामात राजकारण नको. सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणुक नको, गरजवंत लोकांची कामे निट करा, प्रशासक काळातील मअधिकारी राजफ मधील अनागोंदी आता संपली पाहिजे. प्रलंबित कामे तात्काळ पुर्ण करा अशा सुचना आ. विजयसिंह पंडित यांनी करुन जास्तित जास्त विकासकामे करणारी पंचायत समिती म्हणुन गेवराई पंचायत समितीची ओळख व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गेवराई पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह तहसिलदार, गटविकास अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मांडलेल्या तक्रारींचे त्याच ठिकाणी निराकरण केल्यामुळे आ. विजयसिंह पंडित यांच्या भुमिकेचे तालुक्यातील सरपंच व इतरांनी स्वागत केले.
गेवराई विधानसभा मतदार संघाचे आ. विजयसिंह पंडित यांनी गुरुवार दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. र.भ. अट्टल महाविद्यालयाच्या गोदावरी सभागृहात गेवराई पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी व्यासपिठावर आ. विजयसिंह पंडित, जयभवानी कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, तहसिलदार संदिप खोमने, गटविकास अधिकारी श्रीमती मिना कांबळे, नरेगाचे गटविकास अधिकारी अशोक राठोड, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष कालिदास नवले, दैठणचे सरपंच प्रतापसिंह पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बैठकीला गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक यांच्यासह पंचायत समितीचे सर्व विभाग प्रमुख आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत मग्रारोहयो योजनेसह पंचायत समितीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही सरपंचांनी बैठकीत केलेल्या तक्रारींचे निराकरण जागेवरच केल्यामुळे आ. विजयसिंह पंडित यांच्या भुमिकेचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलतांना माजी आमदार अमरसिंह पंडित म्हणाले की, येणारा काळ वादादित करण्यापेक्षा सार्वाधिक विकास कामे करणारा असावा यासाठी आपण सर्वजन समन्वयाने प्रयत्न करु. सामान्य लोकांसाठी अधिकारी व कर्मचारी यांनी पुर्ण वेळ कार्यालयात उपस्थित रहाणे आवश्यक आहे. आजवर लागलेल्या चुकीच्या पद्धती बंद करा, तक्रारीसाठी कागद काळे करण्याची वेळी आमच्यावर आणू नका असा इशारा देवुन त्यांनी दर सोमवारी आपण पंचायत समिती येथे जनतेच्या कामासाठी उपलब्ध असणार असल्याचे सांगितले. त्यांनी मुद्देनिहाय कामकाजा बाबत अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले.
आ. विजयसिंह पंडित यांनी बैठकीची सुरुवात करतांना लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन केले. बैठकीत बोलतांना त्यांनी सांगितले की, लोकांची कामे करतांना गट-तट, पक्ष-संघटना पाहू नका, नियमात असेल ते काम प्राधान्याने करा, कोणाचीही आडवणुक करु नका प्रत्येक लाभार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे. गायगोठे, घरकुल, विहीरी, रेशीम आणि मोहगणीची लागवड अशा वैयक्तीक लाभांच्या योजनेतील लाभार्थ्यांची आर्थीक पिळवणुक खपवुन घेणार नाही हे सांगतांना प्रलंबित कामे पुर्ण झाल्याशिवाय नविन कामे मंजुर करु नयेत अशी सुचना त्यांनी यावेळी केली. मधल्या काळात लोकप्रतिनिधींचे पंचायत समितीकडे दुर्लक्ष झाले असेल मात्र मी स्वत: आता लक्ष घालणार असल्यामुळे कर्तव्यात कसुर करणार्यांची आपण गैय करणार नाहीत असेही त्यांनी सांगितले. पंचायत समितीच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी आजची बैठक असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.