बालाजीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासासाठी खाली तिरुपतीत उतरलं की रेल्वेत बसण्यापूर्वी जेवण्याची घाई असते,तिथे मराठमोळं जेवण कुठे मिळते हे माहित असल्याने सर्वांची पावलं अशा हॉटेलकडे वळतात तेव्हा रस्त्यावर ठेवलेल्या पाट्यांवर स्व गोपीनाथ मुंडे यांची मोठमोठी छायाचित्र लक्ष वेधून घेतात,आणि येथे आपल्याला आपल्यासारखं जेवण मिळेल याची खात्री पटते आणि मिळतेही! मराठी माणसाचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिरुपतीच्या हॉटेलचालकांना स्व मुंडेंचाच आधार वाटला यातूनच स्व.मुंडेंची सर्वप्रियता लक्षात येते!
नाकावर रिडींग ग्लास,हातात कुणीतरी कुणाला तरी लावून दिलेला मोबाईल,त्याआधी त्यांचे ते केसातून कंगवा फिरवणे,कंगव्याच्या फोल्डरमध्येच बसवलेल्या आरशात छबी न्याहाळणे! आजही जशाला तस्से आठवते.पत्रकार परिषदेची सुरुवात करतानाच प्रचंड आत्मविश्वासाने आपले म्हणणे ठामपणाने मांडणार आणि म्हणणार,”विचारा काय विचारायचे ते!” आणि मग प्रश्न-,उत्तराची जुगलबंदी रंगायची, अगदी नवोदित पत्रकार सुद्धा त्यांना धाडसाने प्रश्न विचारायचा आणि ते ही त्याला सन्मानाने उत्तर द्यायचे, असं कधीच झालं नाही की त्यांनी काहीतरी महत्वाची बातमी दिली नाही.स्व.मुंडेंमुळे बीडचे पत्रकार राज्यस्तरावरच्या बातम्या करू शकले,काही विषय असो नसो,पत्रकारांना निरोप जाणार,कधी पत्रकार परिषद तर कधी जमलेल्या पत्रकारांशीच बोलणार,देशातल्या कोणत्याही घटनेवर प्रतिक्रिया मग अत्यन्त हजरजबाबीपणे देणार, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया असा भेदभाव त्यांनी कधीही केला नाही,बीडच्या प्रत्येक पत्रकाराला त्याच्या आणि त्याच्या दैनिकाच्या नावानिशी ते ओळखत होते,बीडच्या बहुतांश दैनिकांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झालेला आहे एवढे ते पत्रकारात प्रिय आणि हवे-हवेसे होते! त्यांचे काही विषय हे अत्यन्त जिव्हाळ्याचे होते ज्यात साखर कारखाने,ऊसतोड कामगार,ऊस उत्पादक शेतकरी,शेतकरी या विषयावर काही विचारलं की,भरभरून बोलायचे विशेषतः इथेनॉल निर्मीती मध्ये त्यांना अधिक रस होता,इथेनॉल बद्दल प्रश्न विचारला की खुलायचे आणि म्हणायचे
“अरे,प्रश्न काय विचारतोस,प्लँट पाहायला ये कारखान्यावर!” त्यांनी जी साखरकारखानदारी केली ती प्रस्थापितांना धक्का देणारी होती आणि म्हणूनच ते एकाच वेळी कारखानदारही होते आणि ऊसतोड कामगारांचे नेतेही!
मुंडेंची राजकारणात कुणाशीही दुष्मनी नव्हती होते ते विरोधक, हे विरोधकही त्यांचे कायमस्वरूपी विरोधक राहिले नाहीत त्यांनी मुंडेंना आणि मुंडेंनी त्यांना कधी ना कधी सहकार्य केलेच! राजकारणातून बाद झालेली काही घराणी त्यांनी पुनर्जीवित केली आणि त्यांना प्रस्थापितही केले यातील काहींनी त्यांना धोकाही दिला पण मुंडे डगमगले नाहीत,संघर्ष त्यांच्या पाचवीलाच पुजलेला होता,गोदापरिक्रमा करणाऱ्या या माणसाने वंचितासाठी काम करून मोठं पुण्य पदरी पाडून घेतलं होतं म्हणून जनता त्यांच्या पदरात भरभरून दान टाकत राहिली हे प्रेम अजून किती तरी वाढत राहिलं असतं पण ते घेण्यासाठी मुंडेच इथं थांबले नाहीत ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले पण अनंताचे कल्याण करून!!!
—महेश वाघमारे,बीड