
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण करोडपती वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी म्हटले आहे की, माझ्या मुलाची वयाशी संबंधित बोन टेस्ट आधीच झाली आहे आणि तो पास झाला आहे. वडील संजीव सूर्यवंशी यांनी पीटीआयला सांगितले की, ‘तो फक्त आमचा मुलगा नाही, तो संपूर्ण बिहारचा मुलगा आहे.
संजीव सूर्यवंशीनी सांगितले की, त्याच्यासाठी मी माझी जमीन विकली. अजूनही परिस्थिती पूर्णपणे सुधारलेली नाही. माझ्या मुलाने खूप मेहनत घेतली आहे. वयाच्या 8 व्या वर्षी त्याची जिल्ह्याच्या 16 वर्षांखालील संघात निवड झाली. मी त्याला समस्तीपूरला कोचिंगसाठी घेऊन जायचो. कोचिंग संपल्यावर मी त्याला परत आणायचो. वयाच्या साडेआठव्या वर्षी बीसीसीआयने त्याची हाडांची चाचणीही करून घेतली. तो भारताकडून अंडर-19 खेळला आहे आणि मी कोणाला घाबरत नाही. जर त्याला पुन्हा वयाच्या परीक्षेत बसावे लागले तर तो त्यातही उत्तीर्ण होईल.
13 वर्षीय वैभवच्या वडिलांनी सांगितले की, ‘राजस्थान रॉयल्सने त्याला नागपुरात ट्रायलसाठी बोलावले होते. विक्रम राठोड सर (फलंदाजी प्रशिक्षक) यांनी त्याला सामन्याची परिस्थिती सांगितली आणि सांगितले की त्याला 6 चेंडूत 17 धावा करायच्या होत्या. माझ्या पोराने 3 षटकार मारून स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले. अखेर राजस्थानने वैभवला 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले. वैभवची मूळ किंमत ३० लाख रुपये होती, दिल्ली कॅपिटल्सनेही त्याच्यासाठी बोली लावली. शेवटी राजस्थानने त्याला विकत घेतले आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण करोडपती बनवले. लहान वयात इतके पैसे मिळवण्याचे दडपण वैभव कसे पेलणार असा प्रश्न वडिलांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, ‘त्याला फक्त क्रिकेट खेळायचे आहे, बाकी काही नाही. काही वर्षांपूर्वी त्याला डोरेमॉन पाहण्याची आवड होती, पण आता त्याने कार्टून पाहणे बंद केले आहे.