
विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य उमेदवार हे मराठा होते. हा मराठा समाज नेमका कोणासोबत राहिला, मराठा आरक्षणाचा मुद्दा विधानसभेत तेवढा परिणामकारक राहिला का, अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. मराठा, मराठा कुणबी समाजाचे 2024 च्या विधानसभेत नेमके आमदार किती ? याबाबत काही वेगवेगळे मत आहे. काहींच्या मते 204 आमदार हे मराठा, मराठा-कुणबी आहेत, तर काहींनी 150 आमदार हे मराठा, मराठा-कुणबी असल्याचा दावा केला आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाने याबाबत राज्यातील निवडून आलेल्या आमदारांचा अभ्यास करुन यांची आकडेवारी जाहीर केली आहे. यावेळी निवडून आलेले ११२ आमदार हे मराठा, मराठा-कुणबी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी ‘सरकारनामा’ला ही माहिती दिली.
“आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष सामाजिक कार्यकर्त्यांना विचारून घेऊन ही या आमदारांची संख्या कन्फर्म केली आहे. मागील विधानसभेमध्ये मराठा, मराठा कुणबी 118 आमदार होते.(कुणबी मध्ये ५५ कुणबी प्रकार आहेत.त्यातील फक्त मराठा समाजाशी सोयरिकी होतात ते फक्त मोजले आहेत.) यावेळी ११२ आमदार आहेत,” असे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. राज्यात अनुसुचित जाती जमातीसाठी ५४ मतदारसंघ राखीव आहेत.
महाविकास आघाडी आणि महायुतीनेही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली. मराठवाड्यातून निम्म्याहून अधिक मराठा समाजाचे आमदार निवडून आले आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असा संदेश मनोज जरांगे यांनी दिला होता, त्यांच्या आवाहानाला मराठवाड्यातील मराठा समाजाने गांभीर्याने घेतलेले दिसत नाही.
निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले असून मराठावड्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसेल असे म्हटले जात होते. या विभागानेही महायुतीला भक्कम साथ देत 40 जागा दिल्या. महाविकास आघाडीला फक्त सहा जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत मराठा कार्ड चालले नाही, संविधान बचाव मुद्दा फार चालला नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
विधानसभा निवडणूक 2024 मराठा, मराठा-कुणबी आमदार किती?
भाजप : जिंकलेल्या जागा 132 (मराठा, मराठा-कुणबी आमदार 48)
शिवसेना :जिंकलेल्या जागा 57 (मराठा, मराठा-कुणबी आमदार 26)
राष्ट्रवादी काँग्रेस: जिंकलेल्या जागा 41 (मराठा, मराठा-कुणबी आमदार 20)
काँग्रेस: जिंकलेल्या जागा 16 (मराठा, मराठा-कुणबी आमदार 5)
शरद पवार राष्ट्रवादी: जिंकलेल्या जागा १० (मराठा, मराठा-कुणबी आमदार 5)
शिवसेना ठाकरे : जिंकलेल्या जागा 20 (मराठा, मराठा-कुणबी आमदार 6)
अपक्ष : जिंकलेल्या जागा 2 (मराठा, मराठा-कुणबी आमदार 2)
अन्य पक्ष :जिंकलेल्या जागा १० (मराठा, मराठा-कुणबी आमदार ००)
(अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आकडेवारीवरुन)
महाराष्ट्र विधानसभा 2024:एकूण आमदार 288पैकी मराठा, मराठा-कुणबी आमदार : 112
10 आमदार शेकाप, समाजवादी एमआयएम जनसुराज्य असे आहेत.
राज्यात अनुसुचित जाती जमातीसाठी ५४ मतदारसंघ राखीव आहेत.
महाराष्ट्र विधानसभा 2019: मराठा, मराठा-कुणबी आमदार: 118