बीड- बीड विधानसभा मतदारसंघात आज झालेल्या मतदानात 58.33 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला असल्याची प्राथमिक माहिती निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे. या मतदारसंघात 31 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत त्यातच मतदान चालू असतानाच एका अपक्ष उमेदवाराचा मृत्यू झाला आहे.
बीड विधानसभा मतदारसंघात आज उत्साहात मतदान पार पडले. बीड मतदारसंघात एकूण मतदार संख्या तीन लाख 84 हजार 101 असून यापैकी दोन लाख 2018 पुरुष मतदार तर एक लाख 80 हजार 809 महिला मतदार आहेत. आज यातील दोन लाख 24 हजार 47 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला ,यात एक लाख 18 हजार 316 पुरुष आणि एक लाख 5हजार 728 महिला मतदारांनी हक्क बजावला. बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशी लढत होती त्यातही विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर विरुद्ध त्यांचे चुलत बंधू डॉ.योगेश क्षीरसागर हे समोरासमोर उभे होते तर अपक्ष म्हणून अनिलदादा जगताप, ज्योतीताई मेटे हे ही निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे होते या चार उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाल्याचे चित्र मतदारसंघाचा फेरफटका मारला असता दिसून आले. मतमोजणी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी होणार असून त्या दिवशी कोण निवडून येईल हे समजेल मात्र आज तरी प्रत्येक उमेदवार हा आपल्या विजयाचा दावा करीत आहे.