कारखाना शेतकऱ्यांच्या हक्काचा-आ.संदीप क्षीरसागर
बीड/प्रतिनिधी:सहकाराच्या माध्यमातून समृद्धी व्हावी या उद्देशाने तालुक्यातील नवगण राजुरी येथे श्री गजानन सहकारी साखर कारखान्याला मोठ्या अडचणीतून सुरू केले आहे.आपल्या तालुक्यातील व आजूबाजूच्या भागातील ऊस उत्पादकांना शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना मिळाला याचे मला समाधान वाटते.आज खऱ्या अर्थाने हा कारखाना आपल्या सर्व शेतकरी बंधूंच्या हक्काचा असून आगामी काळात या कारखान्याच्या प्रगतीसाठी आपले असेच आशीर्वाद पाठीशी राहू द्या. कारखान्याच्या प्रगतीसाठी अविरत प्रयत्न करेन असे प्रतिपादन आ. संदीप क्षीरसागर यांनी केले.
नवगण राजुरी (ता.बीड) येथील श्री गजानन सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ या वर्षाच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन व मोळीपुजन सोहळा संत महंत व मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित सभासद शेतकरी यांच्याशी संवाद साधताना आमदार संदीप शिरसागर बोलत होते. पुढे ते म्हणाले, श्री गजानन सहकारी साखर कारखाना हा आपल्या सर्वांच्या हक्काचा कारखाना आहे. बीड, शिरूर (का.) व पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळण्यायोग्य परिस्थिती निर्माण होण्यासाठी मी या कारखान्याच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील असून आगामी काळात या कारखान्याच्या प्रगतीसाठी काम केले जाईल.