
बीड जिल्ह्यातील मोठे राजकीय प्रस्थ असणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे आज दुपारी दीड वाजता हॉटेल नीलकमल येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेणार आहेत. या निर्णयावर बीड विधानसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे .
जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्यालाच पाठिंबा द्यावा यासाठी उभे असणारे सर्व उमेदवार त्यांना साकडे घालत आहेत .माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी बीड विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे अन्य उमेदवारापेक्षाही त्यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी जय्यत पूर्वतयारी केली होती. त्या दृष्टीने त्यांनी गेल्या वर्षभरापासून आखणीही केली होती .गेल्या महिन्याभरात त्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन संपर्क वाढवला होता. त्यांना समाजाच्या सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत होता हे सर्व लक्षात घेऊन त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रचाराचा टेम्पो वाढत असतानाच उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या दिवशी त्यांनी कुणालाही कसलीही पूर्वकल्पना न देत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि बीड विधानसभा मतदारसंघात चर्चेला उधाण आले.
त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. अनेकांनी त्यांना याबाबत विचारले पण आपण उमेदवारी अर्ज का परत घेतला याची थोडीही कल्पना त्यांच्याकडून अधिकृतरित्या दिली गेली नाही. विधानसभा निवडणुकीत आता कार्यकर्त्यांनी काय करावे काय करावे? असा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे गेल्या दोन दिवस प्रत्येक कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांनी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले आहे . आज ते आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत .विशेष म्हणजे त्यांचे दोन पुतणे निवडणूक रिंगणात असून त्यात विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तर डॉक्टर योगेश क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उभे आहेत. या दोघांनाही काकांच्या राजकीय आशीर्वादाची गरज आहे तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार अनिल जगताप यांनाही अपेक्षा आहेत. या पार्श्वभूमीवर जयदत्त क्षीरसागर यांचा निर्णय हा बीड विधानसभा मतदारसंघाच्या विजयाचे गणित निश्चित करणारा ठरणार असल्याची चर्चा आहे .हा निर्णय आज दुपारी हॉटेल नीलकमल येथे दीड वाजता जाहीर केल्यानंतर बीड विधानसभेचे चित्र स्पष्ट होईल.