बीड-ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी घोटाळा प्रकरणी ईडीच्या (सक्तवसूली संचालनालय) मुंबई कार्यालयाने ज्ञानराधा व सुरेश कुटे व अन्य व्यक्तींच्या 333 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी जिल्ह्यात 49 गुन्हे नोंद आहेत. सध्या ज्ञानराधाचा अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी व अन्य कोठडीत आहेत.
राज्यासह इंदौर अशा 50 शाखा असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को – ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीत पावणेचार लाख ठेवीदारांचे तीन हजार कोटी रुपयांहून अधिक ठेवी आहेत. ठेवीदारांच्या फसवणूक पकरणी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांसह जालना, संभाजीनगर आदी ठिकाणी सुरेश कुटे व अन्य संचालकांसह अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद झाले आहेत. सध्या सुरेश कुटे, यशवंत कुलकर्णी आदी कोठडीत आहेत.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बीडच्या पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुरेश कुटेसह अन्य नातेवाईक आणि ज्ञानराधा तसेच त्याच्या कुटे समुहाच्या पाच हजार कोटी रुपयांच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्या अटॅच केल्या आहेत. मात्र, ज्ञानराधातून परदेशात पैसा नेल्याने आणि परदेशी गुंतवणूक कुटे समुहात येण्याच्या मुद्द्याने आता ईडीनेही या प्रकरणात लक्ष घातले आहेत. यापूर्वीही ईडीने त्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली होती.
आता सुरेश कुटेच्या कुटे डेअरी, कुटे सन्स फ्रेश डेअरी या कंपन्यांच्या जमिनी, इमारती, प्रकल्प आणि मशिनरी असा सातारा व अहमदनगर जिल्ह्यात संपत्ती जप्त केली आहे. यापूर्वी ईडीने दि. 10 ऑक्टोबर रोजी 1002 कोटी 79 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यावेळी जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना येथील काही इमारती आणि भूखंडांचा समावेश होता.
सप्टेंबर महिन्यात ईडीने सोसायटीची 85 कोटी 88 लाख रुपयांची अचल मालमत्ता जप्त केली होती. यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि बीड येथील काही फ्लॅट, कार्यालयांची जागा आणि भूखंड आदींचा समावेश होता. आतापर्यंत सोसायटीची एकूण 1079 कोटी 87 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. सुरेश कुटेने 2318 कोटी रुपयांचा अपहार करत ते पैसे आपल्या अन्य कंपन्यांत कर्ज रूपाने वळविल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. हे पैसे नंतर रोखीने काढून घेत त्याद्वारे त्यांनी वैयक्तिक मालमत्तांची खरेदी केली.