
काँग्रेसने कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळेला केलेले वायदे फसले. कारण ते सगळे राज्यांच्या एकूण बजेटच्या बाहेर गेले. दोन्ही राज्यांना अनेक योजना बंद कराव्या लागल्या आणि केंद्रातील मोदी सरकारकडे हात पसरावे लागले.म्हणून झेपेल तेवढीच आश्वासने द्या, त्या पलीकडे जाऊ नका. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळा, असा इशारा देणाऱ्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या इशाऱ्याकडे त्यांच्याच पक्षाने पार दुर्लक्ष केले आहे.
नुकत्याच नागपूर येथे झालेल्या सभेत राहुल गांधी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल महाराष्ट्राच्या जनतेला ज्या 5 गॅरंटी दिल्या, त्याचा हिशेब लावला, तर त्या सगळ्या योजनांचा खर्च महाराष्ट्राच्या बजेटच्या निम्म्यापर्यंत येऊन पोहोचतो. म्हणजे तब्बल 3 लाख कोटींच्या खैराती योजना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल जाहीर केल्या. त्यावेळी स्वतः मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे उपस्थित होते.
महाराष्ट्राचे बजेट 6:30 लाख कोटींचे असताना खैराती योजना 3 लाख कोटींच्या झाल्या. यात महिलांना दरमहा 3000 ₹, बेरोजगार युवकांना 4000 ₹, 25 लाखांचा कुटुंब वैद्यकीय विमा, शेतकऱ्यांची 3 लाखांची कर्जमाफी, कर्ज नियमित भरणाऱ्यांना 50000 ₹, मुलींप्रमाणे मुलांना पण मोफत शिक्षण, सगळ्या महिलांना एसटी बस प्रवास मोफत या योजनांचा समावेश आहे.
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेसह वेगवेगळ्या सर्व योजनांचा सगळा मिळून खर्च 75000 कोटींवर गेला. त्यावेळी काँग्रेसने त्याचबरोबर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बिघडेल ,अशी ओरड केली होती, पण त्यांच्याच महाविकास आघाडीने मात्र तब्बल 3 लाख कोटींच्या योजना काल जाहीर केल्या.